रंगीबेरंगी रोषणाई अन् मनोरंजनाची रेलचेल; देवीचे दर्शन, रहाटपाळण्यांची मजा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो):
कर्णपुरा यात्रेतील गर्दीने उच्चांक गाठला असून, देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसह यात्रेचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी तरुणाई आणि बच्चे कंपनीची मोठी गर्दी उसळली आहे. रविवारच्या सुटीचे औचित्य साधत नागरिकांनी यात्रेत मोठ्या संख्येने हजेरी लावली. रविवारी सायंकाळी यात्रेच्या परिसरात पाय ठेवायलाही जागा नसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यंदा नवमी आणि विजयादशमी अर्थात दसरा एकाच दिवशी आल्याने सणाचा उत्साह अधिकच वाढला आहे. त्यातच दसऱ्यापूर्वीचा शेवटचा रविवार असल्यामुळे कर्णपुरा यात्रेत भाविकांची मोठी गर्दी झाली. सकाळपासूनच यात्रेच्या परिसरात नागरिकांची वर्दळ वाढत होती. सायंकाळ होताच गर्दीचा ओघ अधिकच वाढला.
यात्रेनिमित्त संपूर्ण कर्णपुरा परिसर रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. आकर्षक दिव्यांची सजावट, विविध खेळांची साधने आणि लहान-मोठ्या रहाटपाळण्यांनी नागरिकांचे लक्ष
वेधून घेतले आहे. उंचावरून वेगाने फिरणारे पाळणे, थरारक खेळ आणि मनोरंजनाच्या विविध प्रकारांचा आनंद घेण्यासाठी तरुणाईची विशेष गर्दी दिसून येत आहे. बच्चे कंपनीसाठीही ही यात्रा आकर्षणाचे केंद्र ठरली आहे. खेळण्यांची दुकाने, खाद्यपदार्थांचे स्टॉल आणि विविध वस्तूंच्या विक्रीसाठी उभारलेली दुकाने यामुळे यात्रेच्या उत्साहात भर पडली आहे.
श्रद्धा, मनोरंजन आणि खरेदीचा आनंद !
यात्रेतील वाढत्या गर्दीचा परिणाम पार्किंग व्यवस्थेवरही दिसून आला. अनेक ठिकाणी वाहनतळ भरल्याचे चित्र होते. गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिसरात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्णपुरा यात्रोत्सव हा केवळ शहरापुरता मर्यादित नसून, संपूर्ण मराठवाड्याचे आकर्षण आहे. शेजारील जिल्ह्यांसह इतर राज्यांतूनही भाविक, व्यापारी आणि विक्रेते या यात्रेत सहभागी होतात. त्यामुळे यात्रेचे स्वरूप दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, धार्मिक श्रद्धेबरोबरच मनोरंजन आणि खरेदीचा आनंद देणारा हा उत्सव नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions












